गणपती कोकण-बेळगाव ट्रीप - भाग दुसरा.

गौरी पूजनाचा दिवस म्हणून आज आम्हाला बऱ्याच नातलगांनकडे जायचे होते. अक्षताच्या माहेरी, आईच्या माहेरी, आईच्या काकांनकडे, आईच्या आत्याकडे, आमच्या गावी (आईच्या सासरी) आणि मग शेवटी शिवराम दळवी यांच्या कडे. आईच्या तत्कालीन तब्बेती नुसार एवढे सर्व करणे काही शक्य नव्हते. म्हणून बरीच ठिकाण वगळली आणि आईच्या माहेरी, आमच्या गावी आणि शेवटी कसाल जवळ शिवराम दळवी यांच्या कडे एवढेच करायचे असे ठरले.

मस्त पोट भरून नाश्ता केला आणि आईच्या माहेरी भातगावला जायला निघलो. हातखांब्याला डिझेल भरून जाकादेवी मार्गे भातगावला गेलो. वाडीतून घराची वाट चालत असताना मला एक निराळी पद्धत पाहायला मिळाली. जवळ जवळ प्रत्येक घरातून ध्वनिक्षेपक वरून पूजा ऐकायला मिळत होती. कुठे सत्यनारायणाची पूजा तर कुठे अथर्वशीर्ष आणि मधूनच गणपती स्तोत्र. माझ्या आजोळच्या घरी पण गणपतीची पूजा चालू होती आणि हि सुद्धा ध्वनिक्षेपक द्वारेच. पूजा होई पर्येंत परत इकडेही आग्रहास्तव नाश्ता करावा लागला. गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघलो.

परत जाकादेवी-हातखंबा मार्गे लांजा-पुनसला आमच्या मूळ घरी गेलो.

इकडे गणपती आणि गौरी पूजन झाले होते आणि आरतीची तयारी चालू होती. साळवी घराण्यातील सर्वात तरुण पिढी घरी आली म्हणून सर्व म्हातारी पण सर्वांत जास्त अनुभव असलेल्या पिढी कडून "चला या आता हे सर्व तुम्ही शिकून घ्या आणि या पुढे तुम्ही हे सर्व करायचे" असे सूर कानावर ऐकायला यायला लागले. लगेच हात-पाय धुऊन मी आजोबांना मदतीला लागलो. सर्व तयारी करून जोरांत आरतीला सुरवात झाली.


पुन्हा एक दणदणीत आरती, मज्जा आली.


देवाचे दर्शन झाले आणि आता आम्हाला पाहायला मिळणार होते ते कोकणातील प्रसिद्ध पद्धत. वोवसा!!! आता तुम्हाला वोवसा म्हणजे काय ते सांगायला पाहिजे. सुपात ५ प्रकारच्या भाज्या, ५ प्रकारच्या वेलींची पाने, ५ प्रकारची फळे, करंडा फणी, ओटी (खण व नारळ) आणि वानाच्या पानावर सुटे पैसे असे सर्व प्रत्येक सुपात ठेवून, अशी ५ सुपे गौरीच्या पुढ्यात वोवसन्या साठी ठेवतात. आता वोवसने म्हणजे काय ते पण सांगायला पाहिजे. घरातील सुवासिनी गौरी समोर जाऊन पहिले हळद-कुंकू लावून गौरीची पूजा करायची आणि मग २ हातांनी भरलेले सूप धरून गौरी समोर करून खाली ३ वेळा सूप ओढायचे. या प्रकियेला गौरीला वोवसने असे म्हणतात. नवीन लग्न झालेली मुलगी ५ सूप घेऊन पहिली आपल्या माहेरच्या गौरीला वोवसा वोवसून सासरी सूप घेऊन यायचे आणि सासरच्या गौरीला वोवसायचे अशी पद्धत आहे.


पण यंदा नवीन वोवसे नाहीत असे आमच्या कानावर सारखे पडत होते. ज्या वर्षी पूर्व नक्षत्रावर गौरी पूजनाचा दिवस असतो त्यावर्षी नवीन वोवसे वोवसतात. यंदा वोवसे पूर्वत नव्हते असे सर्व घरचे लोक म्हणत होते आणि म्हणून आमच्या मंडळीचा यंदा नंबर नव्हता. श्या! पैसे कमवायची पण संधी नव्हती वाटत यंदा. वोवसा वोवसून झाले कि सर्व लहान आपल्या पेक्षा मोठ्या माणसांच्या पाया पडून वोवश्यातले पान वाण म्हणून देतात आणि सर्व मोठी मंडळी आशीर्वादाच्या स्वरुपात भरगच्च पैसे देतात.

सर्व सोपस्कार उरकून आम्ही जेवणाला बसलो आणि पाहातोतर कर आमच्या देवाला तिखट जेवणाचा प्रसाद होता. बरेचदा ऐकून होतो कि कोकणात गौरीला तिखट जेवणाचा प्रसाद असतो. पण ते पाहायला मिळाले ते हि आमच्याच घरी. व्हा... मस्त चम-चमित तिखट जेवणावर ताव मारला आणि पडवीत आराम करत बसलो.

पान, तंबाखू आणि सुपारीचा स्वाद लुटताना सर्व साळवी.......

थोडावेळ आराम करून आम्ही सावंतवाडीच्या दिशेने निघालो. आम्ही आणि माझे पुण्याचे काका आता पुढे पाठी होतो.

मधेच विश्रांती म्हणून आम्ही काकांच्या ओळखीच्या एक परिवाराकडे कणकवलीला थांबलो. त्यांच्या कडे बसवलेला हा गणपती...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणपतीची सुंदर आरास आणि सुबक गणपती असतात हे मी फार ऐकून होतो. याची पहिली प्रचीती मला मिळाली.

थोडा विरंगुळा आणि चहा फराळ करून पुढे निघायच्या तयारीला लागलो. पण आता माझी थोड पोट दुखायला लागले होते. मस्त लिंबू सोडा मारला आणि पुढे निघालो.

रस्ता बराच खराब होता आणि ट्राफिक पण मजबूत होती. कसे बसे ९ च्या दरम्यान आम्ही कसाल जवळ शिवराम दळवी काकांच्या घरी पोहोचलो. मला तसे फार बरे वाटच नव्हतेच. फ्रेश होऊन त्यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले आणि आराम करत बसलो. मला बरे वाटत नव्हते म्हणून मी काही जेवलो पण नाही.

तळ कोकणा मध्ये रात्री प्रत्येकाच्या घरी वाडीतील मंडळी भजनाला येतात असे मी ऐकून होतो. हे हि मला इकडे पाहायला मिळणार होते. पण मला काय बरे वाटतच नव्हते. बरेच औषध-उपचार करून झाले तरी हि बरे वाटतच नव्हते, सारखे पोटात मळ-मळत होते. मधेच थोड्या वेळाने मला उलटी झाली.

ठरल्या प्रमाणे रात्री उशिरा भजन मंडळी आली आणि ठसके दार भजनाला सुरवात झाली. मी भजन रेकॉर्ड करायला लागलो पण मला मळ-मळत होतच आणि पुन्हा एकदा मला उलटी झाली. आता मात्र माझ्यात भजन ऐकायची इच्छा असून सुद्धा भजनाला बसायची ताकद नव्हती. म्हणून मी तसाच झोपी गेलो.

No comments:

Post a Comment